विनोद राठोड, मुंबई. Maratha Reservation Protest Updates: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर आंदोलक सहभागी झाल्याने, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी सर्व सुट्ट्या रद्द केल्या आहेत. सुट्टीवर गेलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आंदोलनाला पुन्हा मिळाली परवानगी!
मुंबई पोलिसांनी सुरुवातीला जरांगे यांच्या आंदोलनाला फक्त एका दिवसाची परवानगी दिली होती. मात्र, आंदोलकांची गर्दी पाहता पोलिसांनी आंदोलनासाठी आणखी एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आंदोलन सुरूच राहणार आहे.
वाहतुकीवर मोठा परिणाम!
आझाद मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने दक्षिण मुंबईतील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
- सीएसएमटी, नरिमन पॉईंट, फोर्ट, काळबादेवी आणि क्रॉफर्ड मार्केट परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे.
- महानगरपालिकेच्या बसेस तासन्तास अडकून पडल्या आहेत, तर लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.
- ईस्टर्न फ्रीवे, व्ही.एन. पुरव रोडसह अनेक महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेत, तर अनेक मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे.