मुंबई. मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकात गर्दीच्या वेळेत प्रवाशांची होणारी कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. स्थानकाच्या दक्षिण दिशेकडील पादचारी पुलावर पश्चिम बाजूला नव्याने उभारण्यात आलेला अतिरिक्त जिना प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे फलाटावर जाणाऱ्या आणि स्थानकाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना ये-जा करण्यासाठी आणखी एक पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे.
प्रभादेवी स्थानकात सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. फलाटावर जाणारे प्रवासी आणि लोकलमधून उतरून स्थानकाबाहेर पडणारे प्रवासी एकाच मार्गाचा वापर करत असल्याने जिने आणि पादचारी पुलावर गर्दीची परिस्थिती निर्माण होते. अनेकदा या गर्दीमुळे प्रवाशांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिन्याची उभारणी करण्यात आली आहे.
80 दिवसांत बांधकाम पूर्ण; महापालिकेचे स्वच्छतागृह हटवून जागा उपलब्ध
या जिन्याच्या उभारणीसाठी संबंधित ठिकाणी असलेले मुंबई महापालिकेचे जुने सार्वजनिक स्वच्छतागृह हटविण्यात आले. महापालिकेकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळाल्यानंतर पश्चिम रेल्वेने बांधकामाला सुरुवात केली. अवघ्या 80 दिवसांत हे काम पूर्ण करून जिना प्रवाशांच्या वापरासाठी खुला करण्यात आला आहे.
कॅरोल उड्डाणपूल पाडल्यानंतर वाढला पादचारी वाहतुकीचा ताण
प्रभादेवी परिसरातील कॅरोल उड्डाणपूल पाडल्यानंतर या भागातील पादचारी वाहतुकीत वाढ झाली. परिणामी स्थानकाच्या पश्चिमेकडील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर तसेच दक्षिणेकडील पादचारी पुलावर प्रवाशांची गर्दी वाढत होती. यावर उपाय म्हणून पश्चिम रेल्वे आणि मुंबई महापालिकेने संयुक्तपणे प्रवाशांच्या हालचाली अधिक सुलभ करण्यासाठी उपाययोजना हाती घेतले आहेत.
यापूर्वी दक्षिणेकडील पादचारी पुलाच्या प्रवेशद्वाराची रुंदी 2.1 मीटरवरून 5 मीटर करण्यात आली होती. आता अतिरिक्त जिनाही खुला झाल्याने प्रवाशांना ये-जा करण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रभादेवी स्थानकातील प्रवासी कोंडी फुटणार आहे.
