जेएनएन, मुंबई: राज्यात अमली पदार्थांची तस्करी आणि वाढत्या सेवनाचा प्रश्न गंभीर होत असतानाच मुंबईतील मालाड पूर्वेकडील कुरार, आप्पापाडा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेशी संबंधित असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  

काही तरुण अमली पदार्थांच्या नशेत असल्याचा दावा केला जात आहे. त्यातील एका तरुणाच्या हातात जबरदस्तीने इंजेक्शन देताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसाकडून घटनेचा तपास केला जात आहे.  

मात्र, या घटनेमुळे कुरार-आप्पापाडा परिसरातील अमली पदार्थांच्या उपलब्धतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या दाव्यानुसार, परिसरातील काही अल्पवयीन मुले आणि तरुण अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. याच पार्श्वभूमीवर एका 19 वर्षीय तरुणाचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. 

परिसरात भीतीचे वातावरण 

कुरार परिसरात अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याच्या चर्चांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले आणि किशोरवयीन मुले अमली पदार्थांच्या विळख्यात अडकण्याची शक्यता असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परिसरातील अमली पदार्थांची विक्री आणि सेवन रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. 

दरम्यान, या प्रकरणाची सखोल तपासणी पोलिसांकडून करण्यात यावी अशी मागणी होत आहे. 

    दरम्यान व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती कोण आहेत, त्यांना अमली पदार्थ कोणी पुरवले, परिसरात ड्रग्जचा पुरवठा कोण करत आहे आणि 19 वर्षीय तरुणाच्या मृत्यूमागे नेमके कारण काय आहे, याचा तपास होण्याची आवश्यकता आहे. 

    या प्रकरणातील व्हायरल व्हिडीओ आणि स्थानिकांचे दावे यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. त्यामुळे पोलिस तपासातूनच अमली पदार्थांचा पुरवठा, कथित ओव्हरडोस आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत अधिक स्पष्ट माहिती समोर येणार आहे.