रायगड. Monsoon Rain Alert: रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसह सर्व अंगणवाड्या आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा प्रशासन यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यानुसार अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर या सात तालुक्यांमधील सर्व शैक्षणिक संस्था आणि अंगणवाड्या आज बंद राहणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचणे, नदी-नाले दुथडी भरून वाहणे आणि काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी-ओढे आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे तसेच हवामान विभाग आणि प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. पावसाची तीव्रता वाढल्यास आवश्यकतेनुसार आणखी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
