Mumbai Metro : मुंबई मेट्रो एकामागून एक माईलस्टोन पार करत आहे. मुंबई मेट्रोने आणखी एक किर्तीमान  आपल्या नावावर केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वडाळा-ठाणे मेट्रो मार्गिका 4 वर 56 मीटर लांबीचा, 450 टन वजनाचा लोखंडी पूल (steel-span) यशस्वीरित्या बसवला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या मोठ्या इंस्टॉलेशनसाठी सामान्य जीवन अजिबात विस्कळीत झाले नाही.

मुंबई मेट्रोने घाटकोपर-मुलुंड लिंक रोड (GMLR) च्या प्रचंड वाहतूक असलेल्या भांडुप-सोनापूर जंक्शनवर रात्रीच्या वेळी हा पूल बसवला. दिवसाच्या वाहतुकीत कमीत कमी अडथळा निर्माण व्हावा यासाठी हे काम रात्रीच्या वेळी पूर्ण करण्यात आले. 

मुंबई मेट्रो लाईन 4 च्या बांधकाम कामातील ही कामगिरी एक मोठा टप्पा माजला जात आहे. पूल बसवण्याचे काम जवळपास 84.5% पूर्ण झाले आहे.

या मार्गाची एकूण लांबी अंदाजे 35.2 किमी आहे आणि ती वडाळा ते कासारवडवली (ठाणे) पर्यंत 32 स्थानकांना जोडेल.

एमएमआरडीएच्या एका निवेदनानुसार, स्टील स्पॅनची रचना दोन-गर्डर आहे आणि ती बसवण्यासाठी नऊ उच्च-क्षमतेच्या क्रेन, दोन मल्टी-अ‍ॅक्सल पुलर आणि १०० हून अधिक कुशल अभियंते आणि तंत्रज्ञांची मदत घेण्यात आली.

एमएमआरडीएने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ -

    मुंबई मेट्रो प्रशासनाने सोशल मीडियावर या कामगिरीची माहिती देताना म्हटले आहे की, आपल्या सर्वांना माहित आहे की रोम एका दिवसात बांधले गेले नाही. मुंबई मेट्रोचा विकास निश्चितच वेगाने सुरू आहे. कठीण हवामान आणि अनियमित पाऊस असूनही, आमच्या टीमने हे काम अत्यंत कार्यक्षमतेने पूर्ण केले.

    मुंबई वाहतूक पोलिस, बीएमसी आणि महावितरण विभागाच्या सहकार्याने ही कारवाई सुरक्षितपणे पार पडली. ही कामगिरी उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्याचा पुरावा आहे. मेट्रो प्रशासनाने हे देखील दाखवून दिले आहे की मुंबई कशी जलद, सुरक्षित आणि स्मार्ट प्रवासाकडे वाटचाल करत आहे.