मुंबई. Mumbai Local Train: मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय लोकल रेल्वेच्या इतिहासात मोठा बदल होणार आहे. मुंबईत मेट्रोप्रमाणेच आता उपनगरीय लोकल ट्रेनही जमिनीखालून धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम रेल्वेने चर्चगेट-प्रभादेवीदरम्यान स्वतंत्र भूमिगत उपनगरीय रेल्वे बोगदा उभारण्याच्या प्रस्तावाला गती दिली असून, या प्रकल्पासाठी अंतिम स्थान सर्वेक्षण (Final Location Survey - FLS) करण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. याशिवाय मध्य रेल्वेवरील स्वतंत्र भूमिगत मार्गाचाही प्राथमिक स्तरावर अभ्यास सुरू आहे.या प्रकल्पमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे वाहतुकीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रस्ताव?

सध्या चर्चगेट ते प्रभादेवीदरम्यान उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या एकाच कॉरिडॉरवर धावतात. त्यामुळे या मार्गावर प्रचंड ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी उपनगरीय लोकलसाठी स्वतंत्र भूमिगत बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव आहे.

रेल्वे बोर्डाने या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेची तपासणी करण्यासाठी फायनल लोकेशन सर्व्हे (FLS) मंजूर केला आहे. या सर्व्हेमध्ये मार्ग, भूगर्भीय स्थिती, तांत्रिक अडचणी, खर्च आणि प्रकल्पाची व्यवहार्यता यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.

कुठून कुठे असणार मार्ग?

सध्याच्या प्रस्तावानुसार—

    * मार्ग: चर्चगेट ते प्रभादेवी

    * स्वरूप: पूर्णपणे भूमिगत उपनगरीय रेल्वे बोगदा

    * उद्देश: लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीचे विभाजन करणे सोपे होणार आहे. या बोगद्यामुळे विद्यमान रेल्वे मार्गावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.

    मध्य रेल्वेसाठीही स्वतंत्र योजना

    पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेच्या मार्गावरही स्वतंत्र भूमिगत रेल्वे कॉरिडॉर उभारण्याबाबत प्राथमिक अभ्यास सुरू आहे. अद्याप या मार्गाचा अंतिम आराखडा तयार झालेला नसला तरी भविष्यात मुंबईतील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन स्वतंत्र भूमिगत लोकल नेटवर्क उभारण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

    भूमिगत लोकलची गरज का?

    मुंबई उपनगरीय रेल्वेवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अनेक मार्गांवर क्षमतेपेक्षा जास्त गाड्या धावत असल्याने वेळापत्रकावर ताण येतो. त्यातच नव्या मार्गांसाठी जमिनीची उपलब्धता ही मोठी अडचण आहे.

    अशा परिस्थितीत भूमिगत मार्ग उभारल्यास—

    * उपनगरीय आणि एक्स्प्रेस गाड्यांचे स्वतंत्र मार्ग तयार होतील.

    * विद्यमान मार्गावरील ताण कमी होईल.

    * भविष्यात अधिक लोकल सेवा सुरू करता येतील.

    * प्रवास अधिक वेळेवर आणि सुरळीत होण्यास मदत होईल.

    * मुंबईतील रेल्वे नेटवर्कचा विस्तार जमिनीचे कमी अधिग्रहण करून शक्य होईल.

    मुंबईत भूमिगत वाहतुकीला वेग

    गेल्या काही महिन्यांत मुंबईत भूमिगत मेट्रो सेवा सुरू झाली असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ठाणे खाडीखालील भूमिगत बोगद्याचे कामही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता उपनगरीय लोकलसाठीही भूमिगत मार्गाचा पर्याय विचार सुरू आहे.