मुंबई. पनवेलहून वसई-विरारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पनवेल ते वसईदरम्यान थेट उपनगरी रेल्वे सेवा सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या या 69.23 किलोमीटर लांबीच्या रेल्वे कॉरिडॉरसाठी 12 हजार 710 कोटी 82 लाख रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या मार्गावर एकूण 17 स्थानके उभारण्याचे नियोजन असून, सुमारे 28 किलोमीटरचा मार्ग उन्नत स्वरूपात बांधण्यात येणार आहे.

सध्या पनवेलहून वसई, विरार, नालासोपारा किंवा पश्चिम उपनगरांमध्ये जाण्यासाठी प्रवाशांना थेट लोकलची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना कुर्ला, दादर अन्य स्थानकांवर उतरून दुसरी लोकल पकडावी लागते.नोकरी-व्यवसायानिमित्त दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दीच्या वेळेत लोकल बदलताना मोठा त्रास सहन करावा लागतो. प्रस्तावित पनवेल-वसई रेल्वे कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर हा त्रास कमी होण्याची अपेक्षा आहे. पनवेलहून थेट वसईपर्यंत उपनगरी रेल्वेने प्रवास करता येणार असल्याने पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील संपर्क अधिक सुलभ होणार आहे.

12 हजार 710 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

मुंबई नागरी परिवहन प्रकल्प अर्थात एमयूटीपी-३ बी अंतर्गत या रेल्वे मार्गिकेची उभारणी करण्याचे नियोजन आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) या प्रकल्पाची प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारच्या पायाभूत सुविधा समितीने यापूर्वी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यानंतर प्रकल्पासाठी 12 हजार 710 कोटी 82 लाख रुपयांचा सुधारित खर्चाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. आता केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या आर्थिक व प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा आहे.

या प्रकल्पात एकूण 69.23 किलोमीटर लांबीचा स्वतंत्र उपनगरी रेल्वे कॉरिडॉर विकसित केला जाणार आहे. मार्गातील महामार्ग, खाड्या आणि दाट नागरी वस्ती यांसारख्या भौगोलिक अडचणी लक्षात घेऊन सुमारे 28 किलोमीटरचा मार्ग उन्नत स्वरूपात बांधण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कमी जागेत रेल्वे मार्ग उभारणे शक्य होणार आहे.

नवी मुंबई, भिवंडी आणि वसई-विरारला फायदा

    या रेल्वे मार्गाचा फायदा केवळ पनवेल आणि वसईमधील प्रवाशांनाच होणार नाही, तर नवी मुंबई, भिवंडी आणि वसई-विरार या वेगाने विकसित होणाऱ्या परिसरांनाही होणार आहे. या भागांमध्ये निवासी वसाहती, औद्योगिक क्षेत्रे आणि व्यावसायिक केंद्रांचा विस्तार होत आहे. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. मात्र, या भागांमधील थेट रेल्वे संपर्क मर्यादित असल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा ताण पडतो.

    नव्या रेल्वे कॉरिडॉरमुळे या परिसरातील प्रवाशांना पर्यायी आणि अधिक सोयीस्कर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होऊ शकते. तसेच भविष्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक पट्टे आणि नव्याने विकसित होणाऱ्या नागरी क्षेत्रांशी रेल्वे संपर्क मजबूत करण्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.