नवी मुंबई. ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हा निर्धार अखेर नवी मुंबईने प्रत्यक्षात उतरवला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 मध्ये नवी मुंबईने ‘सुपर स्वच्छ लीग’ श्रेणीत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने देशातील पहिल्या तीन स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळवणाऱ्या नवी मुंबईने यंदा अव्वल स्थान मिळवत गुजरातच्या सुरतला मागे टाकले. सुरतने दुसरा, तर आंध्र प्रदेशातील विजयवाड्याने तिसरा क्रमांक मिळवला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

विशेष म्हणजे, गेल्या आठ वर्षांपासून देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या मध्य प्रदेशातील इंदूरला यंदा वेगळ्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. ‘स्वच्छ शहर जोडी’ या नव्या उपक्रमांतर्गत इंदूरला मार्गदर्शक शहर म्हणून निवडण्यात आले होते. या श्रेणीत इंदूर आणि त्याचे सहकारी शहर डेपाळपूर यांनी संयुक्त कामगिरीच्या आधारे दुसरा क्रमांक मिळवला. अहमदाबाद आणि साणंद या जोडीने पहिला, तर तिरुपती आणि कुप्पम यांनी तिसरा क्रमांक मिळवला. त्यामुळे यंदाच्या सर्वेक्षणात स्वच्छ शहरांच्या क्रमवारीचे स्वरूप काहीसे बदलले आहे.

नवी मुंबईच्या यशामागे सातत्यपूर्ण प्रयत्न

नवी मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांत स्वच्छतेच्या बाबतीत सातत्याने सुधारणा करण्यावर भर दिला. घरोघरी कचरा संकलन, ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणे, सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता आणि नागरिकांचा सहभाग या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. रस्ते, पदपथ, स्कायवॉक तसेच गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्यासाठीही महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविण्यात आले आहेत. 

स्वच्छता व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला. कचरा संकलन आणि वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी एकात्मिक नियंत्रण कक्षाचा वापर, नागरिकांच्या तक्रारींसाठी डिजिटल व्यासपीठे, प्लास्टिक प्रतिबंधक मोहिमा आणि विद्यार्थ्यांसह नागरिकांचा स्वच्छता उपक्रमांमध्ये सहभाग अशा उपाययोजनांचा शहराच्या कामगिरीला फायदा झाला. नवी मुंबईला सात तारांकित कचरामुक्त शहराचा दर्जा आणि ‘वॉटर प्लस’ प्रमाणपत्रही मिळाले आहे.

रत्नागिरी आणि विटानेही उमटवला ठसा

    यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील अन्य शहरांनीही राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कोकणातील रत्नागिरीने स्वच्छ किनारी शहरांच्या श्रेणीत देशात तिसरा क्रमांक मिळवला. ओडिशातील पुरीने पहिला, तर केरळमधील अलप्पुझाने दुसरा क्रमांक मिळवला. किनारपट्टीवरील स्वच्छता, समुद्रकिनाऱ्यांवरील कचऱ्याचे व्यवस्थापन आणि सागरी प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने या श्रेणीला महत्त्व देण्यात आले आहे.

    सांगली जिल्ह्यातील विटा नगरपरिषदेने 20 हजार ते 50 हजार लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात देशात पहिला क्रमांक पटकावला. या गटात ओडिशातील अस्का आणि गोव्यातील पणजी यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला. त्यामुळे नवी मुंबईच्या राष्ट्रीय यशासोबतच विटा आणि रत्नागिरीच्या कामगिरीनेही महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

    4,751 शहरांचा सहभाग; नागरिकांच्या अभिप्रायालाही महत्त्व

    स्वच्छ सर्वेक्षणाच्या दहाव्या आवृत्तीत देशभरातील 4,751 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग होता. यंदाच्या सर्वेक्षणात नागरिकांचा अभिप्राय, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, उघड्यावर शौच आणि लघुशंका रोखण्यासाठीच्या उपाययोजना, पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता तसेच शाळांमधील जनजागृती यांसारख्या बाबींवर विशेष भर देण्यात आला. तीन हजारांहून अधिक प्रशिक्षित मूल्यांकनकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. जीपीएस आधारित देखरेख आणि डिजिटल पडताळणीच्या माध्यमातून सर्वेक्षण प्रक्रिया पार पडली.

    या सर्वेक्षणात देशभरातील 2.70 कोटी नागरिकांनी अभिप्राय नोंदवला. तसेच 350 हून अधिक शहरांनी मागील वर्षाच्या तुलनेत 500 पेक्षा अधिक क्रमांकांची सुधारणा केली. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत शहरांमध्ये निर्माण झालेली स्पर्धा आणि नागरिकांचा वाढता सहभाग या निकालातून स्पष्ट झाला आहे.