जेएनएन, मुंबई: मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे या पावसाने अनेक भागात पाणी साचले आहे. या पावसाने लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन (OHE) वर प्लास्टिक अडकल्यामुळे कांजूरमार्ग आणि भांडुप दरम्यान CSMT च्या दिशेने जाणाऱ्या 'स्लो' मार्गावरील लोकल सेवा थांबवण्यात आली आहे. OHE चा वीजपुरवठा बंद करून ते प्लास्टिक काढण्याचे काम सुरू असून, लवकरच सेवा पूर्ववत केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या CPRO ने दिली आहे.
Mumbai, Maharashtra | Local services halted between Kanjurmarg and Bhandup on slow line towards CSMT because of a Plastic stuck on Overhead Electrification (OHE). The plastic is being removed by turning off OHE and services will be restored shortly: CPRO CR
— ANI (@ANI) July 6, 2026
मुंबईत ताशी 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला असून ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (State Disaster Management Authority) यांनी मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे (Work From Home) निर्देशित केले आहे.
रायगडमधील सखल भागात पूरस्थिती
मुसळधार पावसामुळे रायगडमधील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाणी साचल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे.
सरकारी कार्यालये केवळ अर्धा दिवस चालू
मुंबईसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, खाजगी कार्यालयांना शक्य असेल तिथे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यास सांगण्यात आले आहे. हवामानाच्या परिस्थितीमुळे शहरातील अत्यावश्यक नसलेली सरकारी कार्यालये केवळ अर्धा दिवस चालू राहतील.
