जेएनएन, मुंबई: मुंबई उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या, त्यामुळे दरदिवशी लोकलमधून पडून प्रवाशांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी मुंबईत एम.यु.टी.पी अंतर्गत 33 हजार कोटीचे प्रकल्प आहेत. तसेच 238 उपनगरीय गाड्यांना स्वयंचलित दरवाजे लावण्याचे काम सुरु असून 15 डब्यांच्या गाड्या सोडण्यासाठी 34 रेल्वे स्थानकाची लांबी वाढवण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत खासदार रविंद्र वायकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
खासदार रविंद्र वायकर काय म्हणाले…
मुंबईत उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान उपनगरीय रेल्वेमध्ये प्रवाशांची वाढती लोकसंख्या, रेल्वेतून पडून प्रवाशांचे होणारे मृत्यू, या प्रश्नी प्रश्नाच्या मध्यातून चिंता व्यक्त केली. त्यांनी लोकल मधून पडून 2015 ते मे 2025 पर्यंत 26,547 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर्षी हे प्रमाण 7% नि कमी झाले असले तरी दरदिवशी सरासरी 6 प्रवाशांचा मृत्यू होत आहे. रेल्वे मंत्रालयासाठी यावर्षी 2 लाख 93 हजार कोटींचे बजेट आहे. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालय डबलडेकर रेल्वे सुरु करण्यासाठी रेल्वेची भूमिका काय? तसेच कोकण रेल्वेचे दुपदरीकरणाचे काम कधी पर्यंत पूर्ण करण्यात येईल? असे प्रश्न खासदार वायकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी विचारला.
मुंबई लोकल प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सोयीचा प्रश्न आज मी लोकसभेत मांडला! 🚉
— Ravindra Waikar (@RavindraWaikar) March 11, 2026
मुंबई लोकल ही करोडोंची जीवनवाहिनी आहे, मात्र दररोज सरासरी ६ प्रवाशांचा जीव रेल्वे ट्रॅकवर जाणे ही अत्यंत दुर्दैवी आणि चिंतेची बाब आहे. रेल्वेच्या २.९३ लाख कोटींच्या ऐतिहासिक बजेटचा वापर करून:
✅ मुंबई… pic.twitter.com/wJB9lfWz2e
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले…
यावर उत्तर देतानाचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, लोकल मधील गर्दी कमी करण्यासाठी बांद्रा, मुंबई सेन्ट्रल, जोगेश्वरी, दादर, वसई, परेल, विरार, डहाणू, मिरारोड, पनवेल, कल्याण तसेच एल.टी.टी रेल्वेस्थानाजवळ रेल्वे मार्ग वाढवण्याचे तसेच अन्य विकासाची जी कामे सुरु आहेत.
तसंच, 15 डब्यांची लोकल सुरु करण्यासाठी 34 रेल्वे स्थानकाची लांबी वाढवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. 238 लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचे काम सुरु आहे. कोकण रेल्वेच्या दुपद्रीकरणाचे काम करण्यासाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) बनवण्याचे काम सुरु असून यात 4 राज्यांची गुंतवणूक आहे. यातील महाराष्ट्र व गोवा राज्याची मंजुरी प्राप्त असून कर्नाटक व केरळ राज्याची मंजुरी मिळणे आवश्यक आहे, अशी माहिती वैष्णव यांनी लोकसभेत दिली.
