जेएनएन, मुंबई. मुंबईकरांनो, रविवारी लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक नक्की तपासा. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान रविवारी, मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या देखभाल-दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहतील, तर काही लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असल्याने प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत रात्रकालीन ब्लॉक घेतला आहे. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असणार नाही.
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान ब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान सर्व नियोजित स्थानकांवर थांबणार आहे. त्यानंतर मुलुंड येथे पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे, ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड येथे धीम्या मार्गावर वळवण्यात आले आहे. त्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान सर्व नियोजित स्थानकांवर थांबणार आहे. पुढे माटुंगा येथे पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.
या बदलामुळे लोकल गंतव्यस्थानी सुमारे 15 मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच काही लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. खोपोलीहून सीएसएमटीकडे दुपारी 1.48 वाजता सुटणारी लोकल पुनर्निर्धारित वेळेनुसार दुपारी 2.06 वाजता सुटणार आहे.
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी लोकल सेवा प्रभावित
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे . त्यामुळे सीएसएमटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेलदरम्यान धावणाऱ्या लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार आहे
या वेळेत कोणत्या लोकल रद्द राहणार?
* सीएसएमटीहून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहतील.
* पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 या वेळेत सीएसएमटीकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्याही रद्द राहणार.
प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष अप आणि डाउन लोकल चालवण्यात येणार आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावरील तसेच बेलापूर-उरण पोर्ट मार्गावरील लोकल सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे ते वाशी, नेरुळ आणि संबंधित स्थानकांदरम्यान पर्यायी मार्गाने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्रीनंतर 12.30 ते रविवारी पहाटे 4.30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत जलद मार्गावरील लोकल संबंधित धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. काही लोकल फेऱ्या रद्द होण्याची, तर काही विलंबाने धावण्याची शक्यता आहे.
