मुंबई. आसनगाव-कसारा रेल्वे मार्गिकेवरील विविध कामांसाठी मध्य रेल्वेकडून 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकल गाड्या आसनगावपर्यंतच धावणार असून, काही गाड्या आसनगावहूनच परतीच्या प्रवासाला रवाना करण्यात येणार आहेत. त्यामुळे कसारा आणि परिसरातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या तसेच मुंबईहून कसारा दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना वेळापत्रक लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.

विशेष ब्लॉकच्या पहिल्या टप्प्यात 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी सीएसएमटीहून कसाऱ्याकडे दुपारी 1.10, 2.17, 2.46 आणि 4.50 वाजता सुटणाऱ्या लोकल सेवा आसनगावपर्यंतच धावणार आहेत. त्यामुळे या लोकलच्या पुढे कसारा दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना आसनगाव येथे उतरून पुढील उपलब्ध रेल्वेसेवेचा वापर करावा लागण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे कसारा येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या दुपारच्या आणि संध्याकाळच्या काही लोकलच्या फेऱ्यांमध्येही बदल करण्यात आला आहे. दुपारी 3.35, 4.16, सायंकाळी 5.02 आणि 6.17 वाजता कसाऱ्याहून सुटणाऱ्या लोकल आसनगावहूनच सीएसएमटीच्या दिशेने रवाना होणार आहे. 

ब्लॉकपूर्वी शेवटच्या लोकलच्या वेळेत बदल

ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी काही सेवांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. सीएसएमटीहून कसाऱ्याकडे जाणारी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल दुपारी 12.30 वाजता सुटणार आहे. तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणारी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल दुपारी 2.42 वाजता रवाना होईल.

याशिवाय 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी सीएसएमटीहून कसाऱ्याकडे जाणारी शेवटची लोकल रात्री 9.32 वाजता, तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणारी शेवटची लोकल रात्री 10 वाजता सुटणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

    प्रवाशांना वेळापत्रक तपासून प्रवासाचे आवाहन

    आसनगाव-कसारा मार्गावर काम सुरू असताना लोकल सेवांच्या फेऱ्या आणि वेळांमध्ये टप्प्याटप्प्याने बदल होणार आहेत. त्यामुळे कसारा, टिटवाळा, आसनगाव आणि परिसरातील प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रक तपासावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.