मुंबई. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या ड्रोन शोदरम्यान एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. या शोमध्ये सहभागी असलेला एक ड्रोन अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन चर्चगेट रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या डोक्यावर कोसळला. या दुर्घटनेत संबंधित प्रवासी जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने रक्तस्राव सुरू झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चर्चगेट रेल्वे स्थानकात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
माहितीनुसार, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एका टेलिकॉम कंपनीच्या वतीने ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोदरम्यान आकाशात मोठ्या संख्येने ड्रोनच्या माध्यमातून आकर्षक दृश्ये साकारण्यात येत होती. मात्र, याचवेळी एका ड्रोनच्या नियंत्रणात बिघाड झाल्याने तो भरकटला आणि चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या परिसरात येऊन पडला. स्थानकात उभ्या असलेल्या एका प्रवाशाच्या डोक्यावर हा ड्रोन आदळल्याने तो जखमी झाला.
ड्रोन अचानक डोक्यावर कोसळल्याने संबंधित प्रवाशाला दुखापत झाली. त्याच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून स्थानकातील इतर प्रवासी घाबरले. सुरुवातीला नेमके काय घडले, याचा कोणालाही अंदाज येत नव्हता. अचानक आकाशातून एखादी वस्तू येऊन डोक्यावर पडल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी जखमी व्यक्तीच्या मदतीसाठी धाव घेतली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर हा प्रकार वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या ड्रोन शोशी संबंधित असल्याचे समोर आले. त्यामुळे सुरुवातीला अनाकलनीय वाटणाऱ्या या घटनेमागील कारण स्पष्ट झाले.
ड्रोन शोच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या ड्रोन शोच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर करून आकाशात विविध आकृत्या आणि दृश्ये साकारली जात असताना तांत्रिक बिघाड झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, हे या घटनेतून समोर आले आहे.
