मुंबई. Mumbai Crime News: विक्रोळी परिसरात आज पहाटे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत मोठ्याने गाणी लावण्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादाचे रूप हिंसाचारात झाले. या घटनेत 40 वर्षीय सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा 14 वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा यांचा मृत्यू झाला. तर सुनील विश्वकर्मा यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि धाकटा मुलगा विवान विश्वकर्मा हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

विक्रोळीतील राहुल नगर परिसरात ही घटना घडली. हा परिसर पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. पहाटेच्या सुमारास मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या मुद्द्यावरून कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि त्याचे रूप गंभीर हाणामारीत व प्राणघातक हल्ल्यात झाले.

नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विक्रोळीतील राहुल नगर येथे विश्वकर्मा कुटुंबातील तीन भाऊ एकाच घरात रहात होते. यापैकी दोघेजण घराच्या पोटमाळ्यावर राहत होते. यातील सुनील विश्वकर्मा यांनी घरात पहाटे मोठ्या आवाजात गाणी लावली होती. यावरुन त्यांचे दोन भाऊ सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी सुनील यांना जाब विचारला. यावरुन भावा-भावांमध्ये वाद होऊन याचे पर्यावसान हाणामारीत झाले. परिस्थिती इतकी टोकाला गेली की, सुरेंद्र आणि सूरज विश्वकर्मा यांनी सुनील विश्वकर्मा आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा 14 वर्षांचा मुलगा श्लोक विश्वकर्मा यांचा मृत्यू झाला तर सुनील यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि लहान मुलगा विवान हे दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे विक्रोळी पार्कसाईट परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

परिसरात खळबळ-

या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा श्लोक विश्वकर्मा गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे राहुल नगर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    घटनेत अंजू विश्वकर्मा आणि त्यांचा धाकटा मुलगा विवान विश्वकर्मा हेही जखमी झाले आहेत. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

    घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात नेमका वाद कशामुळे वाढला, हल्ल्यासाठी कोणत्या प्रकारचे शस्त्र किंवा वस्तू वापरण्यात आली, याचा तपास सुरू आहे.

    पोलिसांकडून संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात असून, या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुहेरी हत्येमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.