मुंबई. मराठी अस्मितेच्या राजकारणावर सातत्याने चर्चा होत असताना मुंबईत मराठी माध्यमाच्या शिक्षणाचे चित्र मात्र चिंताजनक होत चालले आहे. गेल्या दहा वर्षांत मुंबई महापालिकेच्या (BMC) तब्बल 80 मराठी माध्यमाच्या शाळा बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. 2015-16 मध्ये महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या 421 होती. ती 2024-25 पर्यंत घटून 341 वर आली आहे.
याच काळात मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. 2015-16 मध्ये या शाळांमध्ये 51 हजार 691 विद्यार्थी शिक्षण घेत होते. 2024-25 मध्ये ही संख्या 47 हजार 233 वर आली. म्हणजेच गेल्या दशकात 4 हजार 458 विद्यार्थ्यांची घट झाली आहे.
चार वर्षांतच 19 शाळांची घट
विशेष म्हणजे, मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या कमी होण्याचा वेग अद्यापही कायम असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. 2021-22 ते 2024-25 या अवघ्या चार वर्षांच्या कालावधीत 19 मराठी शाळांची घट झाली आहे. त्यामुळे भविष्यात मराठी माध्यमाच्या शिक्षणाचे जाळे आणखी कमी होणार असल्याचे चित्र आहे.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध स्तरांवर प्रयत्न आणि राजकीय घोषणा केले जात असले तरी प्रत्यक्षात मातृभाषेतील शिक्षण देणाऱ्या शाळांची संख्या सातत्याने कमी होत असल्याने शिक्षण क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली
एका बाजूला मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या घटत असताना दुसऱ्या बाजूला मुंबई महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2015-16 मध्ये BMCच्या इंग्रजी माध्यमाच्या131 शाळा होते. ही संख्या 2024-25 पर्यंत वाढून 190 वर पोहोचली आहे.म्हणजेच मराठी माध्यमाच्या शाळा कमी होत असताना इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाकडे पालकांचा कल वाढत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. रोजगाराच्या संधी, उच्च शिक्षण आणि जागतिक स्तरावरील स्पर्धेत इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याला प्राधान्य देत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल
मुंबईसारख्या महानगरात बदलती सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती ही देखील या बदलामागील महत्त्वाचा घटक मानला जात आहे. अनेक पालकांना आपल्या मुलांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्यास भविष्यात चांगली नोकरी आणि करिअरच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.
त्यामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीबद्दल आत्मीयता असतानाही शिक्षणाच्या माध्यमाबाबत पालक इंग्रजीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. मात्र, याचा अर्थ मराठी माध्यमातील शिक्षणाची गुणवत्ता कमी आहे, असा नसून मराठी शाळांना आधुनिक सुविधा, तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
पायाभूत सुविधांचाही प्रश्न
मराठी माध्यमाच्या शाळांची घट होण्यामागे पायाभूत सुविधांचा अभाव, बदलती लोकसंख्या, विद्यार्थ्यांची कमी होणारी संख्या आणि पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल ही प्रमुख कारणे मानली जात आहेत.
मुंबईतील अनेक भागांमध्ये जुन्या शाळांच्या इमारती, मर्यादित जागा आणि बदलत्या शैक्षणिक गरजांनुसार आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधांचा प्रश्न आहे. डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम, प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा आणि इंग्रजीसह अन्य कौशल्यांचे प्रशिक्षण या बाबतीत मराठी माध्यमाच्या शाळांना अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे.
