जेएनएन, मुंबई. Ladki Bahin Yojana September Installment : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महायुती सरकारची एक महत्वाकांक्षी योजना असून ऑगस्ट महिन्यापर्यंतचे प्रतिमाह 1500 रुपये पात्र लाभार्थ्यांना मिळाले आहेत. राज्यभरातील महिलांना सप्टेंबर महिन्याच्या हफ्त्याची प्रतीक्षा असून केवायसी पूर्ण करण्याचेही टेन्शन महिला लाभार्थ्यांना आहे. दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. 

अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे की, सप्टेंबर महिन्याच्या १५०० रुपयांचे  वितरण उद्यापासून (10 ऑक्टोबर) सुरु करण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सप्टेंबर महिन्याच्या सन्मान निधीची रक्कम जमा होईल. 

सप्टेंबरचा हफ्ता कधी होणार जमा -

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये अनुदान दिले जाते. हे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जातात. आता लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी मिळालेला नव्हता, त्यामुळे सप्टेंबरचा हफ्ता कधी मिळणार? याकडे लाडक्या बहि‍णींचं लक्ष लागलं होतं.

लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड -

दरम्यान, आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहि‍णींना दिवाळीआधीच मोठी खुशखबर दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा निधी कधी मिळणार? याबाबत आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत थेट तारीख सांगितली आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आजपासून (10 ऑक्टोबर) वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे.

    आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. 

    महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून  https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील 2 महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती, असं आदित तटकरे यांनी म्हटलं. 

    लाडकी बहीणची ई-केवयसी कोणत्या वेबसाईटवर करायची?

    महिला व बालविकास विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक वेबसाईट तयार केली आहे. त्या वेबसाईटवर लाभार्थी महिलेने ई केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे.  https://ladakibahin.maharashtra.gov.in ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट आहे. लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना लाभार्थी महिलेची आधार व्हेरिफिकेशन त्याशिवाय पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाचे व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे.  ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून ज्या महिला ई- केवायसी प्रक्रिया करणार नाहीत त्यांचा लाभ मिळणं बंद होऊ शकतं.