जेएनएन, मुंबई: 'स्वस्त आणि सुरक्षित ' प्रवासाचा आनंद घेण्यासाठी यंदा शाळा - महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळ नवीन बसेस उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टी संपली की, शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सहलीचे वेध लागतात. शालेय सहली हा विद्यार्थी जीवनातील अतिशय संस्मरणीय असा अनुभव असतो. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय सहलीसाठी त्यांच्या एकूण भाड्यामध्ये 50 टक्के सवलत देते. त्यामुळे अतिशय मापक दरामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देणे शक्य होते. तो त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील एक उपक्रम असतो. 

अर्थात, यंदा एसटीकडे असलेल्या नवीन बसेस या शालेय सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्यभरात असल्या एसटीच्या 251 आगारांमधून दररोज 800 ते 1000 बसेस विविध शाळा- महाविद्यालयांना सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

मागील वर्षी शालेय सहलीसाठी 19624 बसेस उपलब्ध करून दिल्या.

मागील वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान राज्यभरातील विविध शाळा- महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळाने तब्बल 19624 बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. या माध्यमातून एसटीला तब्बल 92 कोटी रुपयांचा (प्रतिपुर्ती रक्कमेसह ) महसूल प्राप्त झाला होता. 

यंदा देखील प्रत्येक आगारातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा- महाविद्यालयांना दररोज एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात बाबत आवाहन करण्यात येत आहे. आगारप्रमुख, स्थानकप्रमुख स्वतः शाळा -महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना भेटून विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या सहलीचे आयोजन करण्यासाठी आवाहन करीत आहेत.