जेएनएन, मुंबई. Maharashtra News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) राज्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साध्या (लालपरी) बससेवेसाठी लागू करण्यात आलेली 10 टक्के तात्पुरती भाडेवाढ आता 31 जुलै 2026 पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. वाढत्या डिझेलच्या किमती आणि वाढलेला इंधन खर्च लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
महामंडळाने यापूर्वी उन्हाळी हंगामातील अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी तात्पुरती भाडेवाढ लागू केली होती. ही मुदत संपत असताना आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. डिझेलचे वाढते दर, बससेवेचा वाढलेला संचालन खर्च आणि महामंडळावरील आर्थिक ताण कायम असल्याने ही भाडेवाढ आणखी एका महिन्यासाठी वाढविण्यात आली आहे.
वाढीव दरानेच काढावे लागणार तिकीट
या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो प्रवाशांना 31 जुलैपर्यंत वाढीव दरानेच तिकीट काढावे लागणार आहे. साध्या बससेवेसाठी लागू असलेली 10 टक्के वाढ कायम राहणार असून, इतर श्रेणीतील बससेवांच्या भाड्यात कोणताही नवीन बदल जाहीर करण्यात आलेला नाही.
महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंधन खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने महसूल आणि खर्च यामधील तफावत भरून काढण्यासाठी हा निर्णय आवश्यक घेण्यात आला आहे. एसटीची सेवा ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी असल्याने सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी आर्थिक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, 31 जुलैनंतर भाडेवाढ कायम ठेवायची की पूर्वीचे दर लागू करायचे, याबाबतचा निर्णय त्या वेळच्या इंधन दर, आर्थिक स्थिती आणि महसुलाचा आढावा घेतल्यानंतर घेतला जाणार असल्याची माहिती महामंडळच्या अधिकाऱ्याने दिली.
