मुंबई -Maharashtra weather update: बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ ‘मोंथा’ (Cyclone Montha) सध्या तीव्र रूपात सक्रिय आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनाऱ्यावर चक्रीवादळने मोठा तडाखा दिला आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, या वादळाचा केंद्रबिंदू सध्या काकीनाडा (आंध्र प्रदेश) किनाऱ्याजवळ आहे. त्याठिकाणी वाऱ्याचा वेग 90 ते 110 किलोमीटर प्रतितास इतका नोंदवला गेला आहे.

कोकणापासून विदर्भापर्यंत हवामानात बदल -

या चक्रीवादळाचा थेट मार्ग महाराष्ट्रावर नसला तरी, त्याचा परिणाम राज्यात ढगाळ हवामान, वादळी वारे आणि अधूनमधून पावसाच्या स्वरूपात दिसू लागला आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीपासून ते विदर्भापर्यंत काही ठिकाणी हवामानात बदल जाणवत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, पुढील दोन दिवस महाराष्ट्रात संमिश्र हवामान राहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारे आणि समुद्रात उंच लाटा निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई आणि उपनगरांमध्ये आज कसे राहणार हवामान?

    मुंबई आणि उपनगरात आज ढगाळ वातावरण राहणार आहे. सकाळपासूनच हलका दमटपणा आणि ढगांचे प्रमाण वाढलेले आहे.सकाळी अनेक ठिकाणी हलक्या सरी पडले आहे. तर दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

    • कमाल तापमान: 31°C
    • किमान तापमान: 26°C
    • वाऱ्याचा वेग: 20–30 किमी/तास
    • समुद्रात लाटा वाढण्याची शक्यता; किनाऱ्यांवर सतर्कता -
    • मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणचा अंदाज!
    • मराठवाडा:- आकाश ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी हलका पाऊस किंवा वाऱ्यासह सरींची शक्यता वर्तवली आहे.
    • मध्य महाराष्ट्र:- दिवस ढगाळ, अधूनमधून सूर्यदर्शन; सायंकाळी विजांसह पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
    • कोकण:- किनाऱ्याजवळील भागांत वाऱ्याचा वेग वाढणार, काही ठिकाणी मुसळधार सरींचा इशारा. मच्छीमारांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे.