मुंबई l मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर मनसेकडून ‘भगवा गार्ड’ तैनात करण्यात आल्याने आज सकाळपासूनच राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले. बोगस मतदारांना रोखण्यासाठी ‘भगवा गार्ड’ कार्यरत असल्याचा दावा मनसेकडून करण्यात येत असून, बोगस मतदार आढळले तर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, या भूमिकेमुळे काही ठिकाणी पोलिस आणि ‘भगवा गार्ड’ कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याच्या घटना समोर आले आहेत.
बोरिवलीतील आयसी कॉलनी परिसरात सकाळी मतदान सुरू असतानाच ‘भगवा गार्ड’चे कार्यकर्ते मतदान केंद्राच्या आसपास उभे राहिल्याने पोलिसांनी त्यांना 100 मीटरच्या बाहेर राहण्याच्या सूचना दिले . यावरून काही काळ पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करत वातावरण शांत केले.
मनसेकडून दावा करण्यात येत आहे की, शहरातील अनेक प्रभागांमध्ये बोगस मतदानाच्या तक्रारी येत असल्यानेच ‘भगवा गार्ड’मार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. “खरे मतदार सुरक्षित राहावेत आणि बोगस मतदारांवर आळा बसावा, यासाठीच ही भूमिका, असे मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने मात्र कायदा हातात घेऊ नये, असे स्पष्ट करत मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना थांबण्यास मनाई असल्याचे पुन्हा सांगितले आहे. कुणीही गैरप्रकार करताना आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला.
मुंबईतील काही मतदान केंद्रांवर या पार्श्वभूमीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी बहुतेक ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
