एजन्सी, ठाणे. Thane News: मागील काही दिवसांपासून राज्यात मराठी माणसांमध्ये भाषेच्या प्रश्नावरुन असंतोष (Language Row) पाहायाला मिळाला आहे. यातच ठाण्यातील मीरारोड परिसरात व्यापारी संघटनांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मराठी भाषिकांनी मोर्चाची हाक दिली होती. मात्र, या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही या मोर्चात अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, मराठी भाषिक नागरिक सहभागी झाले होते. यावेळी, मीरा भाईंदर परिसरात निदर्शने करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

सोमवारी मध्यरात्रीपासून पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली. त्यात मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांच्यासह इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना व्हॅनमध्ये बसवून पोलिस ठाण्यात नेले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की पोलिसांनी आंदोलन करण्यास परवानगी देण्यास नकार दिला नव्हता, तर महाराष्ट्रातील प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. वाहतूक आणि गर्दीचा धोका होता. पोलिस आयुक्तांनी सांगितले की मनसे नेत्यांना मार्ग बदलण्यास सांगण्यात आले होते, परंतु ते त्यांनी त्यांचा त्याच मार्गावर आंदोलन करण्याचा हट्ट होता, म्हणून त्यांना थांबवण्यात आले."

कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही. आपल्याला एकाच राज्यात एकत्रित राहायचे आहे. राज्याच्या विकास करायचा आहे. जर आंदोलकांनी योग्य मार्ग मोर्चासाठी मागितला तर ती परवानगी कधीही मिळेल, आजही आणि उद्याही मिळेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

    दरम्यान, या घटनेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मीरारोड येथे व्यापारी संघटनेने मोर्चा काढला आणि पोलीस आम्हाला घोडबंदर रोडला मोर्चा काढायला सांगत होते. मीरारोडच्या घटनेचा घोडबंदरला कोण मोर्चा काढते? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती. मराठी माणसांना जेलमध्ये टाकायचे असेल तर टाकावे आता हे आंदोलन या मोर्चाला पोलीस परवानगी देत नाहीत तोवर सुरू राहणार असं ते म्हणाले.