जेएनएन, मुंबई. Maratha Protest Mumbai : मराठा आंदोलनावर आज निर्णायक चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी आज सरकार आणि मराठा आंदोलक यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे.राज्य सरकारने सुरुवातीपासूनच आरक्षणाच्या विषयावर सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली आहे.
- आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक चर्चा करणार आहे. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्यावे, ही जरांगे पाटील यांची ठाम मागणी असून यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा होणार आहे.
- गुन्हे मागे घेणे - आंदोलनादरम्यान नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावेत, असा आंदोलकांचा आग्रह यावर चर्चा होणार आहे.
- मृत कुटुंबांना मदतीच्या मागणीवर चर्चा केली जाणार आहे. आंदोलनात प्राण गमावलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य व नोकरीबाबत चर्चा होणार आहे.
- राज्य सरकारकडून तज्ञ समितीमार्फत तोडगा काढण्याचा प्रस्ताव करणार आहे.
मुंबई पोलिसांची जरांगे यांना नोटीस -
मनोज जरांगे यांनी सुरू केलेले उपोषण आंदोलन हाताबाहेर गेल्याचं व मुंबई अक्षरश: टप्प झाल्याचे निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवत आज (2 सप्टेंबर) दुपारपर्यंत मुंबईतील रस्ते व आझाद मैदान रिकामं करा, असे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांनी मैदान सोडण्याची नोटीस बजावली आहे.