मुंबई. Mumbai MHADA Flat Scam: सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर मिळावे, यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाकडून (MHADA) दरवर्षी घरांची सोडत काढली जाते. या सोडतीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिकांना घरे उपलब्ध करून दिली जातात. मात्र, मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील म्हाडाच्या घरांच्या वाटपावरून आता वाद निर्माण झाला आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अँटॉप हिल परिसरातील म्हाडाच्या घरवाटपात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या परिसरातील तब्बल ११० फ्लॅट बांगलादेशी घुसखोरांनी बळकावल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे म्हाडाच्या घरांचे वाटप, लाभार्थ्यांची पात्रता आणि घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांची ओळख याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हिंदूंच्या नावावर अर्ज, मात्र प्रत्यक्ष ताबा दुसऱ्यांकडे?

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानुसार, अँटॉप हिलमधील नूरबाजार येथील म्हाडा गृहसंकुलातील काही घरांसाठी मूळ अर्ज हिंदू नागरिकांच्या नावाने करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पॉवर ऑफ अटर्नीच्या माध्यमातून या घरांचा ताबा अन्य व्यक्तींकडे गेल्याचा त्यांचा दावा आहे. मूळ लाभार्थी आणि प्रत्यक्ष घरात राहणाऱ्या व्यक्ती वेगळ्या असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.

यामध्ये अविनाश रविधोने यांच्या नावावर मूळतः वाटप झालेल्या घरात मन्सुरी जुनैद मोहम्मद राहत असल्याचे उदाहरण सोमय्या यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे रमेश घाटाळ, श्याम राऊतकर, मनोज खांबे, श्याम गायकवाड, निर्मला बर्वे आणि विनायक कुंभार यांच्यासह काही मूळ लाभार्थ्यांच्या घरांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

50 हून अधिक रहिवाशांनी सोमय्यांची भेट घेतल्याचा दावा

    या प्रकरणाची पार्श्वभूमी सांगताना सोमय्या यांनी म्हाडा गृहसंकुलातील 50 हून अधिक रहिवाशांनी मुलुंड पूर्व येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतल्याचे सांगितले. या रहिवाशांनी अतिक्रमण, अनधिकृत ताबा, कथित बेनामी व्यवहार, मारहाण आणि धमकावण्याच्या तक्रारी केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

    या तक्रारींची गंभीर दखल घेऊन म्हाडाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. म्हाडाचे अधिकारी आणि काही एजंट यांच्या कथित संगनमतातून हे व्यवहार झाले आहेत का, याचाही तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

    म्हाडाच्या अधिकाऱ्यांना पत्र; 14 नोव्हेंबरला पाहणी करणार

    किरीट सोमय्या यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केल्याचे माहिती आहे. या तक्रारीसोबत काही कागदपत्रे आणि फ्लॅटच्या मूळ लाभार्थ्यांची तसेच पॉवर ऑफ अटर्नीधारकांची माहिती सादर केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

    तसेच, येत्या 14 नोव्हेंबर रोजी अँटॉप हिल येथील संबंधित म्हाडा गृहसंकुलाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणार असल्याचेही सोमय्या यांनी जाहीर केले आहे. या वेळी म्हाडा, महापालिका आणि पोलीस विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.