जेएनएन, मुंबई. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी, 23 ऑगस्ट रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी तसेच देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार असून काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी रविवारी प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
मेन मार्गावर कुठे आणि किती वाजता ब्लॉक?
सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत लोकल गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
डाऊन मार्गावरील बदल -
सीएसएमटीहून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला येथे थांबतील. त्यानंतर विद्याविहार येथे पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.
अप मार्गावरील बदल -
घाटकोपरहून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या लोकल गाड्या विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावरून धावतील. या लोकल कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक
हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेलदरम्यानच्या काही लोकल सेवा बंद राहतील. प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी-कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी-पनवेल या मार्गांवर विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत.
तसेच मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरुळ मार्गाने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे देखभाल काम आवश्यक असल्याचे सांगितले आहे. मात्र रविवारी मेगाब्लॉकमुळे लोकल प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता असल्याने घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचे अद्ययावत वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
