जेएनएन, मुंबई: मुंबईत पावसाळ्यात उघड्या मॅनहोलचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून, शहरातील अनेक भागांत अद्याप मॅनहोल उघड्या किंवा तुटलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील मॅनहोलची झाकणे तुटलेली आहेत, तर काही ठिकाणी मॅनहोल पूर्णपणे उघडे असल्याने पादचाऱ्यांसह दुचाकीस्वार आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, काही मॅनहोल फुटपाथवर असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून त्यांच्याभोवती वाट काढत चालावे लागत आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचते. अशा वेळी उघडे किंवा तुटलेल्या झाकणांचे मॅनहोल पाण्याखाली झाकले जात असल्याने त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे पादचारी अचानक मॅनहोलमध्ये पडण्याची भीती असते. रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी हा धोका आणखी वाढतो. अनेक ठिकाणी मॅनहोलभोवती कोणतेही बॅरिकेड, चेतावणी फलक किंवा तात्पुरती सुरक्षा व्यवस्था नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.  

साकीनाका दुर्घटनेनंतरही स्थिती कायम

साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर उघड्या मॅनहोलच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या दुर्घटनेनंतर अनेक ठिकाणी मॅनहोलच्या आत संरक्षक जाळ्या बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मॅनहोलचे झाकण उघडे राहिले किंवा तुटले, तरी व्यक्ती थेट गटारात पडू नये, यासाठी ही जाळी सुरक्षेचा अतिरिक्त उपाय म्हणून बसवण्यात येत आहे. 

मात्र, शहरातील अनेक भागांत अजूनही मॅनहोल उघडे असल्याचे निदर्शनास येत आहे. काही ठिकाणी झाकणे तुटलेली किंवा हललेली आहेत, तर काही ठिकाणी झाकण पूर्णपणे गायब असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संरक्षक जाळी बसवण्याच्या उपाययोजनेसोबतच मॅनहोलची नियमित तपासणी आणि तातडीने दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त होत आहे.

फुटपाथवरील मॅनहोलही धोकादायक

    रस्त्यांवरील मॅनहोलबरोबरच फुटपाथवरील मॅनहोलही पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. अनेक ठिकाणी फुटपाथ अरुंद असून त्यावरच मॅनहोल उघडे किंवा तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना फुटपाथ सोडून रस्त्यावरून चालावे लागते. परिणामी, एकीकडे मॅनहोलमध्ये पडण्याचा धोका, तर दुसरीकडे भरधाव वाहनांमुळे अपघाताची शक्यता निर्माण होते. 

    ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दिव्यांग व्यक्ती आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांना या परिस्थितीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्ते आणि फुटपाथवरील खड्डे तसेच उघडे मॅनहोल दिसत नसल्याने दुर्घटनेचा धोका वाढत आहे. 

    नियमित पाहणी आणि तातडीच्या दुरुस्तीची मागणी 

    मुंबईतील मॅनहोलची नियमित तपासणी करून तुटलेली झाकणे तातडीने बदलावीत, उघड्या मॅनहोलभोवती बॅरिकेड्स लावावेत आणि धोकादायक ठिकाणी स्पष्ट चेतावणी फलक उभारावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पावसाळ्यात विशेष तपासणी मोहीम राबवून रस्ते आणि फुटपाथवरील सर्व मॅनहोलची सुरक्षा सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त होत आहे. 

    मॅनहोलच्या आत संरक्षक जाळी बसवणे हा महत्त्वाचा सुरक्षात्मक उपाय असला, तरी तो कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. मॅनहोलची मजबूत झाकणे, नियमित देखभाल आणि वेळेवर दुरुस्ती यावर भर देणे गरजेचे आहे. अन्यथा, पावसाळ्यात उघडे मॅनहोल मुंबईकरांसाठी गंभीर अपघाताचे कारण ठरू शकतात.