जेएनएन, मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलिसांकडे आंदोलनासाठी परवानगी मागणारा अर्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आझाद मैदान पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज

माहितीनुसार, जरांगे पाटील यांची मुंबईतच आंदोलन करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, सध्या अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनासाठी परवानगी मागण्यात आलेली नसताना मुंबईतील आझाद मैदान पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

मुंबईत आंदोलनासाठी अर्ज

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही मुंबईच्या दिशेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबईत आंदोलन करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या या अर्जाकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. जरांगे पाटील नेमक्या कोणत्या स्वरूपाचे आंदोलन करणार, त्यासाठी किती लोक मुंबईत येणार आणि आंदोलनाचे ठिकाण व कालावधी काय असेल, याबाबत पोलिसांच्या निर्णयानंतर अधिक स्पष्टता होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, आझाद मैदान पोलिसांकडून या अर्जावर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर आंदोलनाला परवानगी नाकारली तर त्यासाठी पोलिसांकडून नेमकी कोणती कारणे दिली जातात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे, परवानगी देण्यात आली तर कायदा-सुव्यवस्था, गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि आंदोलनाच्या स्वरूपाबाबत पोलिसांकडून कोणत्या अटी व शर्ती घातल्या जातात, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.