मुंबई. Manoj Jarange 500 Crore Audio Clip SIT Probe : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी राज्यातील वातावरण कमालीचं तापलं आहे. आता या प्रकरणी अत्यंत मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय एसआयटीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

मनोज जरांगेंनी केलेल्या 500 कोटीच्या आरोपांवरुन राज्यात मोठे वादंग उठले आहे. गेल्या आठवडाभरापसून महाराष्ट्राच्या राजकारणात 500कोटींचा दावा आणि कथित ऑडिओ क्लिप प्रकरण चांगलेच गाजले आहे. आता याच प्रकरणी फडणवीस सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सोमवारी (26 ऑक्टोबर) या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या कथित ऑडिओ क्लिपमागील सत्य काय? हे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

त्रिस्तरीय समिती करणार चौकशी-

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्रिस्तरीय एसआयटीची स्थापना केली आहे. या समितीची संपूर्ण जबाबदारी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

कोण-कोण आहे एसआयटीत

  • अध्यक्ष: शैलेश बलकवडे (अप्पर पोलीस आयुक्त)
  • सदस्य: विजयकांत सागर (पोलीस उपायुक्त)
  • सदस्य: बजरंग बनसोडे (पोलीस उपायुक्त)

मनोज जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लीपचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी गठीत करण्याचा आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता पोलिसांचे एक विशेष पथक स्थापन केले असून जरांगेनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी केली जाणार आहे.

    काय आहे प्रकरण?

    मनोज जरांगेंनी 22 ऑक्टोबर रोजी जालना येथे पत्रकार परिषद घेऊन एक ऑडिओ क्लिप समोर आणली होती. विधानसभा 2024 निवडणुकांदरम्यानच्या भाजपच्या एका मिटिंगचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाले असून शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंमार्फत पोहोचवण्यात आले, असल्याचे सांगताना दिसत आहे. तसेच, यामध्ये इतर काही भाजपचे नेते असल्याचा दावा करण्यात आला आहे.

    भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, शिवसेनेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप केला आहे. काही प्रवक्त्यांनी ही क्लिप AI निर्मित असल्याचा व संजय राऊत यामागे असल्याचा दावा करत याच्या फॉरेन्सिक चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे.