मुंबई - दक्षिण मुंबईतील नौदल क्षेत्रातून एका कनिष्ठ खलाशाकडून एका चोरट्याने रायफल आणि  मॅगझिन घेऊन पोबारा केला आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय नौदलाने मुंबई पोलिसांसह त्या व्यक्तीचा आणि रायफल शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

कफ परेड पोलिस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. दक्षिण मुंबईतील नेव्ही निवासी भागात शनिवारी रात्री ही घटना घडली, असे त्यांनी सांगितले.

एका ज्युनियर खलाशी, जो ड्युटीवर तैनात होता, त्याला नौदलाच्या गणवेशातील एका व्यक्तीने  जेवणाची वेळ झाल्याचे सांगून त्याचा रिलिव्हर असल्याचे भासवले. 

खलाशाने त्याची रायफल आणि दारूगोळा त्या माणसाच्या ताब्यात दिला. फुल्ल लोडेड रायफल व मॅगझिन घेऊन चोरट्याने घटनास्थळावरून पळ काढला.  काही वेळातच जवानाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. हरवलेल्या वस्तू परत मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या समन्वयाने व्यापक शोध मोहीम सुरू केली आहे.

या घटनेमागील परिस्थितीची चौकशी करण्यासाठी चौकशी पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी इतर सरकारी संस्थांकडूनही सुरू आहे आणि भारतीय नौदल या प्रयत्नांना आवश्यक ती सर्व मदत करत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.