एजन्सी, मुंबई. Mumbai Latest News: मुंबईतील कुर्ला परिसरात मुसळधार पावसात एका दुकानावर झाड कोसळून एका 63 वर्षीय व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतील शहरातील झाड कोसळून झालेली ही दुसरी जीवघेणी घटना आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ही घटना दुपारी 12.40 च्या सुमारास कुर्ला पश्चिमच्या नौपाडा परिसरातील हिंदी बीएमसी शाळेजवळ घडली, असे त्यांनी सांगितले.

पीडित युनूस कुंडावाला यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून तातडीने फौजिया रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

त्यांनी सांगितले की, अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि त्यांनी बचाव व साफसफाईचे काम पार पाडले.

चेंबूरमध्ये चिमुकल्याचा मृत्यू

30 जून रोजी चेंबूरमध्ये एक झाड उन्मळून धावत्या स्कूल बसवर पडल्याने एका 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. या घटनेच्या काही दिवसांनंतर ही घटना घडली आहे.