जेएनएन,मालवण. Malvan Nagarparisad Election:  मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पैशांच्या वाटपाचा मुद्दा उफाळून आला असून, यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. मध्यरात्री उशिरा भाजप कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपानंतर परिसरात तणाव निर्माण झाला.दरम्यान पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली.

पैसे वाटपाची माहिती मिळताच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) स्वतः मालवण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. रात्री सुमारे १ वाजता घडलेल्या या घटनेदरम्यान पोलिसांनी दोन संशयित वाहनांना ताब्यात घेतले. या वाहनांमधून अंदाजे दीड लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रोकड कोणाकडून आणली जात होती, ती निवडणूक प्रक्रियेवर परिणाम साधण्यासाठी वापरली जाणार होती का, हे शोधण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

राणे बंधुंमधील संघर्ष विकोपाला -

या प्रकरणामुळे नितेश राणे आणि निलेश राणे या राणे बंधूंमध्ये सुरु असलेला राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. मालवणमध्ये दोघांचेही मोठे राजकीय अस्तित्व असल्याने त्यांच्यातील तणाव वारंवार चव्हाट्यावर येत असतो. पैशांच्या वाटपामुळे उद्भवलेल्या नव्या वादामुळे या निवडणुकीतील तापमान आणखी वाढले आहे.

निलेश राणेंची सुरक्षा वाढवली -

दरम्यान, निलेश राणे पोलीस स्टेशनमध्ये असताना त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली असल्याची माहिती समोर आली. पोलीस स्टेशनबाहेर राणे समर्थकांची मोठी गर्दी झाल्याने काही वेळ वातावरण तणावपूर्ण होते.

    पोलिसांनी दोन्ही वाहनांचा पंचनामा करून रोकड जप्त केली असून, वाहनचालक आणि संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रोकडचा स्रोत, त्यामागील व्यक्ती आणि उद्देश याबाबत पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. मालवणमधील निवडणूक प्रक्रिया आता अधिकच संवेदनशील बनली आहे. पैशांच्या राजकारणावरून पुढील काही दिवसात आणखी नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.