जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. महाराष्ट्रात येत्या 24 तासात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून पुढील चार दिवस मुंबई पुण्यासह 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईचे आजचे हवामान कसे असेल?
मुंबईत आज रिमझिम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर कोकणात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आजपासून चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 15 ते 19 ऑगस्टदरम्यान मान्सून जोर धरू शकतो, मात्र काही भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत असून अपेक्षित पाऊस झालेला नाही.
पुढील 24 तासांचा हवामान अंदाज!
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
मुंबई व कोकणाचा अंदाज!
आज मुंबई, ठाणे, पालघर येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रविवारला मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे.
वादळी वारे-
हवामान खात्याच्या अंदाजानुसार वादळी वारे 30–40 किमी/तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
घाटमाथ्याचा अंदाज-
पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापुरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
विदर्भाचा अंदाज -
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, यवतमाळमध्ये मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वारे वाहणार आहे.