जेएनएन, मुंबई. राज्यातील पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून, आज विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील बहुतांश भागांत आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात.विदर्भात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 23 सप्टेंबरला विदर्भात जोरदार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा इशारा आहे. त्यानंतर 24 आणि 25 सप्टेंबर रोजी काही भागांत अतिजोरदार पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.  

या जिल्ह्यांना पावसाचा फटका 

धाराशिव, लातूर आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी आणि वादळी वारे वाहू शकतात. मराठवाड्यात 24 आणि 25 सप्टेंबर रोजीही जोरदार पावसाचा इशारा कायम आहे.

विदर्भात यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली परिसरात पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 24 आणि 25 सप्टेंबर रोजी विदर्भासाठी अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणातही जोरदार सरी 

    रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा विभागासाठी आज जोरदार पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा इशारा देण्यात आला असून, 24 सप्टेंबरलाही वादळी हवामानाची शक्यता आहे. 

    मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता

    नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा इशारा असून काही भागांत वाऱ्याचा वेगही वाढू शकतो. 

    दरम्यान, राज्यात ऑगस्टपासून पावसाने दिलेल्या खंडामुळे अनेक भागांत पाण्याची आणि शेतीची चिंता निर्माण झाली आहे. राज्यात पावसाची सुमारे 17 टक्के तूट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत होणाऱ्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

    नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरू असताना मोकळ्या मैदानात, झाडाखाली विद्युत खांबांच्या जवळ थांबू नये. तसेच जोरदार पावसाच्या वेळी स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.