मुंबई, Maharashtra Weather Update Today: गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना आणि उपनगरांतील नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळू लागला आहे. मुंबईच्या आकाशात ढगांची गर्दी होत असून, काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून रात्री उशिरा आणि पहाटेच्या सुमारास हवेत गारवा जाणवत आहे. त्यामुळे दिवसभरातील उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अर्णब चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या हवामानात बदल झाल्याचे चित्र आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसला, तरी त्याच्या प्रभावामुळे वातावरणात बदल जाणवत आहेत. कालपासून राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी असे संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबई, ठाणे आणि कोकणात कसे असेल हवामान?
मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात शुक्रवारी प्रामुख्याने उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडू शकतात. मुंबईत आज कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. रात्रीच्या वेळी पावसाची शक्यता तुलनेने अधिक आहे. मुंबई आणि उपनगरांसाठी सकाळी 12.30 वाजेपर्यंत हलक्या पावसाचा यलो वॉच देण्यात आला होता.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण किनारपट्टीवरील काही भागांत ढगाळ वातावरण राहू शकते. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नाशिकचा घाट परिसर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातही काही भागांत पावसाच्या सरी कोसळू शकतात. दुसरीकडे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचे ढग
पुणे जिल्हा आणि घाटमाथ्याच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही भागांतही पावसाच्या सरी कोसळू शकतात. विशेषतः घाट परिसरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
