मुंबई. Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल झाला आहे. पुढील चार दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी, मच्छीमार आणि नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान खात्याचा अंदाज-

भारतीय हवामान विभागानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचा परिणाम राज्यावर दिसत आहे. या प्रणालीमुळे 23 ते 27 ऑक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. कोकण व गोवामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र: पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा येथे जोरदार सरी पडली आहे. मराठवाडातील बीड, परभणी, लातूर, हिंगोली जिल्ह्यांत गडगडाटासह पाऊस पडला आहे. तर विदर्भमध्ये नागपूर, अकोला, यवतमाळ येथे हलक्याफुलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

वादळी वाऱ्यांचा धोकाही कायम!

हवामान खात्याच्या माहितीनुसार काही भागांत 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने वारे वाहू शकतात. समुद्रकिनारी वसलेले मच्छीमारांनी पुढील काही दिवस खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा-

    अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोयाबीन, कापूस, तूर यांसारखी पिकं कापणीच्या अवस्थेत असल्याने मुसळधार पावसामुळे उत्पादनाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिकं सुरक्षित ठेवण्याचे, कापलेलं उत्पादन झाकून ठेवण्याचे आणि जलसाठ्यांची व्यवस्था करण्याचे आवाहन केलं आहे.