जेएनएन, मुंबई. Maharashtra School Reopen: शिक्षण विभागाने शाळा (School) सुरु करण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू केल्या जाणार असून, उर्वरित राज्यभरातील शाळा 15 रोजी सुरु होतील. तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे (Heat Wave) विदर्भातील शाळांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.
विदर्भातील शाळा 22 जूनपासून होणार सुरू
राज्य सरकारने शाळा सुरू होण्याच्या निर्णयात बदल केला आहे. विदर्भातील उष्णतेची परिस्थिती लक्षात घेऊन तेथील शाळा 22 जूनपासून सुरू होणार असून, महाराष्ट्रातील उर्वरित भागातील शाळा नियोजित वेळेनुसार 15 जूनपासून सुरू होतील. याबाबतचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.
शासनाने जारी केलेल्या पत्रात काय म्हटले?
‘शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2026 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू करणेबाबत राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार दि. 15 जून, 2026 पासून सुरू करण्याबाबत कळविण्यात आले होते.
विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी व नियमित शाळा सुरू करण्याबाबत निवेदन दाखल झालेले आहे. त्यानुषंगाने कळविण्यात येते की, अद्यापि विदर्भातील तापमान हे विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे फक्त विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार दिनांक 22 जून, 2026 पासून सुरू होतील. तसेच दि. 22 जून 2026 ते 30 जून, 2026 या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळच्या सत्रात भरतील व दि. 1 जुलै 2026 पासून शाळा नियमित वेळेत भरतील.
उर्वरित राज्यात मात्र शाळा सोमवार दि. 15 जून, 2026 पासून नियमित वेळेत सुरू होतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.’ असे पत्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी जाहीर केले आहे.

