रायगड. रायगड येथील पाताळगंगा नदीत हजारो गॅस सिलिंडर पाण्यावर तरंगत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर या व्हिडिओने कुतूहल निर्माण केले आहे.
एचपीसीएलचा पातालगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांट रायगडमध्ये आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसरात इतका पाऊस पडला की प्लांटच्या भिंती कोसळल्या. त्यानंतर पुराचे पाणी प्लांटमध्ये शिरले आणि हजारो सिलिंडर पातालगंगा नदी व खारपाडा खाडीत वाहून गेले.
रायगड जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. दरम्यान, पेन आणि खालापूर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाताल गंगा नदीच्या जोरदार प्रवाहात शेकडो एलपीजी गॅस सिलिंडर तरंगताना दिसले.
हे सिलेंडर धरमतरच्या खाडीच्या दिशेने वाहत होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होत आहे. लोक नदीतून गॅस सिलिंडर बाहेर काढतानाही दिसत आहेत. त्याचबरोबर, प्रशासनाने लोकांना आवाहन केले आहे की, जर त्यांना नदीत गॅस सिलिंडर दिसले तर त्यांनी प्रशासनाला कळवावे.
सुमारे 3,000 सिलिंडर गेले वाहून -
मिळालेल्या माहितीनुसार, खालापूर येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एचपीसीएल) एलपीजी बॉटलिंग प्लांटमधील सुमारे 3,000 गॅस सिलिंडर पुराच्या पाण्यात वाहून गेले. असे सांगितले जात आहे की यापैकी काही सिलिंडर भरलेले आहेत, तर काही रिकामे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे चावणे (पाताळगंगा) येथील अतिरिक्त महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) च्या प्लॉट क्रमांक ई-1/7 वरील गोदामात पाणी साचल्याने सिलिंडर नदीत वाहून गेले. घटनेनंतर, अनेक स्थानिक लोक दोरी आणि हुकच्या साहाय्याने नदीत तरंगणारे सिलिंडर बाहेर काढताना दिसले.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीला आलेल्या प्रचंड पुरात शेकडो एलपीजी गॅस सिलिंडर गेले वाहून ! pic.twitter.com/U90lHp1HP8
— निसर्गराजा (@shetakriraja288) July 8, 2026
सिलेंडर दिसला तर प्रशासनाला कळवा.
रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणाला हे गॅस सिलिंडर सापडले असतील, तर ते स्वतःजवळ ठेवण्याऐवजी, त्यांनी ते संबंधित तहसील कार्यालयात किंवा एचपीसीएलच्या अधिकृत डीलरकडे जमा करावेत, जेणेकरून ते सुरक्षितपणे परत घेतले जाऊ शकतील. सध्या प्रशासन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून, सिलिंडर परत गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक तपासानुसार, या घटनेमागे मुसळधार पाऊस आणि पूर ही मुख्य कारणे मानली जात आहेत.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल -
दरम्यान, नदीत तरंगणाऱ्या सिलिंडरचा एक व्हिडिओ कोणीतरी चित्रित केला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. अधिकाऱ्यांच्या मते, नदीत तरंगणाऱ्या सिलिंडरपैकी केवळ काही सिलिंडरमध्येच गॅस भरलेला असू शकतो.
