जेएनएन, मुंबई. राज्यात यंदाच्या मान्सूनमध्ये सुरुवातीच्या दोन महिन्यांत अनेक भागांत दमदार पाऊस झाला असला तरी ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट 20 ते 40 टक्क्यांपर्यंत असल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरीची मोठी भरपाई केली असून, नाशिक जिल्ह्यात 1 जून ते 15 ऑगस्टदरम्यान सरासरीपेक्षा तब्बल 71 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

नंदुरबार, सिंधुदुर्ग, सोलापूर, बीड, लातूर, जालना, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सरासरीहून कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील पिकांच्या स्थितीवर आगामी काळातील पावसाचे प्रमाण निर्णायक ठरणार आहे. 

नाशिकमध्ये सरासरीपेक्षा 71 टक्के अधिक पाऊस 

राज्यातील जिल्हानिहाय पावसाच्या आकडेवारीत मोठी तफावत पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात 1 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत सुमारे 1 हजार 39 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा तब्बल 71 टक्क्यांनी अधिक आहे. 

नाशिकपाठोपाठ पालघर, मुंबई, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतही सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. पालघरमध्ये सरासरीपेक्षा 39 टक्के अधिक, मुंबईत 25 टक्के अधिक, पुणे जिल्ह्यात 45 टक्के अधिक, तर सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा 38 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.  

    यामुळे राज्यातील एकूण पावसाची स्थिती समाधानकारक दिसत असली तरी जिल्हानिहाय परिस्थिती वेगळी आहे. 

    कोकणात दमदार पाऊस, काही भागांत तूट 

    कोकणातील अनेक भागांत यंदा पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा 39 टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे एकाच विभागातील जिल्ह्यांमध्येही पावसाचे प्रमाण वेगवेगळे असल्याचे दिसून येत आहे.

    मराठवाड्यात पावसाच्या खंडाची चिंता 

    मराठवाड्यातील बीड, लातूर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कमी झाल्याने खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.पावसावर अवलंबून असलेल्या भागांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर खरीप पिकांसाठी पुढील पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाचा खंड आणखी वाढल्यास पिकांना पाण्याचा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. 

    विदर्भातही अनेक जिल्हे तुटीत 

    विदर्भातील बहुतांश भागात यंदा पाऊस सरासरीच्या आसपास राहिला असला तरी अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.विदर्भातील खरीप हंगाम मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असल्याने ऑगस्टच्या उत्तरार्धातील पावसाचे प्रमाण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

    आज वादळी पावसाची शक्यता

    पुढील तीन दिवस राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता कमी असून अनेक भागांत हलक्या सरींचा अंदाज आहे. मात्र आज काही भागांत वातावरण बदलण्याची शक्यता असून रायगड, पुणे घाट विभाग, रत्नागिरी, सातारा घाट विभाग आणि कोल्हापूर घाट विभागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.