जेएनएन, ठाणे. Maharashtra Politics: मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजूल पटेल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याचबरोबर राज्यभरातील उबाठा गटाच्या शेकडो पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे यांचे समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि उबाठा गटाच्या महिला संघटक राजूल पटेल, विलेपार्लेचे शाखाप्रमुख सुनील भागडे, वरळीतील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह 40 पदाधिकारी आणि 50 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी नगर, मानखुर्द येथील कार्यकर्ते तसेच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह 20 पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
शिवसेनेचे पक्ष संघटन आणखी मजबूत
त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिकाचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील, जयंती पाटील, अरविंद ठाकूर, शिवशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने मुंबई आणि उपनगरात शिवसेनेचे पक्ष संघटन आणखी मजबूत झाली आहे. (Maharashtra News)
कोल्हापूर, सांगलीतील कार्यकर्ते शिवसेनेत
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी सुजीत समुद्रे, प्रमोध धनावडे, शीतल कांबळे, उल्हास वाघमारे, किरण कांबळे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. सांगली जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रशांत कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्तांनी शिवसेनेत प्रवेश केला.
नाशकातील अनेक सदस्यांनी घेतला शिवसेनेचा भगवा हाती
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, मालेगाव शहापूरमधील 200 कार्यकर्ते, उबाठाचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते पक्ष प्रवेश केला. याशिवाय नाशिक शिक्षक सेना, जळगाव शिक्षक सेनेतील शेकडो सदस्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
राजुल पटेल यांचा अल्प परिचय
राजुल पटेल या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. त्या विधानसभेच्या महिला संघटक आणि माजी नगरसेविका आहेत. पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना तिकिट नाकारण्यात आले. यापूर्वी त्यांनी विधानसभा 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली होती.