जेएनएन, मुंबई. Baba Siddique Case: माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी वडिलांच्या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान बांद्र्यातील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांसंदर्भातील मुद्द्यांवर लक्ष देण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे . जबाबमध्ये झिशानने काही बांधकाम व्यावसायिक आणि राजकीय नेत्यांची नावे पोलिसांना सांगितले आहेत.

जबाब नोंदणीमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्या वडिलांबाबत अपमानास्पद भाषा वापरल्याचे झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना सांगितले. अनेक विकासक पुनर्विकास प्रकल्पांसाठी त्यांच्या वडिलांशी सातत्याने संपर्कात होते अशी माहिती झिशान यांनी पोलिसांना दिली आहे.

झिशानच जबाब नोंदविला

12 ऑक्टोबर 2024 रोजी माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणाशी संबंधित पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात झिशानच जबाब पोलिसांनी नोंदविला आहे. या जबाबमध्ये झिशानने अनेक खुलासे केले आहे.

बाबा सिद्दीकी (66) यांची तीन हल्लेखोरांनी मुंबईतील बांद्रा पूर्व येथे त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या केली.

खोटा गुन्हा दाखल

    झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना सांगितले की, ते आणि त्यांचे वडील सतत बांद्र्यातील झोपडपट्टीवासीयांच्या हक्कांसाठी लढत होते. तसेच, एका पुनर्विकास प्रकल्पाला त्यांनी विरोध केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

    हत्येच्या दिवशी संध्याकाळी..

    झिशान यांनी त्यांच्या जबाबात म्हटले की, "काही बांधकाम व्यावसायिक माझ्या वडिलांच्या नियमित संपर्कात होते. माझ्या वडिलांना त्यांच्या दैनंदिन कामाचा डायरी लिहिण्याची सवय होती. मला समजले की हत्येच्या दिवशी संध्याकाळी 5:30 ते 6 वाजता मोहित कंबोज (भाजप कार्यकर्ता) यांनी त्यांच्या व्हॉट्सॲपपवर संपर्क साधला होता. मोहित बांद्र्यातील मुंद्रा बिल्डर्सच्या प्रकल्पासंदर्भात माझ्या वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त करत होते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या नाव जबाबमध्ये झिशान यांनी घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

    सखोल चौकशी करण्यात यावी

    एसआरए पुनर्विकास प्रकल्पासंदर्भातील एका बैठकीदरम्यान एका बांधकाम व्यावसायिकाने माझ्या वडिलांबद्दल अपमानास्पद शब्द वापरले. माझ्या वडिलांच्या हत्येच्या तपासात वरील सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी विनंती झिशान यांनी पोलिसांना केली आहे.

    बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांनी विशेष एमसीओसीए न्यायालयात 4,500 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

    तीन जण फरार

    यामध्ये 26 आरोपींना अटक करण्यात आली असून शुभम लोंकर, यासीन अख्तर आणि अनमोल बिश्नोई या तीन जणांना फरार आरोपी म्हणून दाखवण्यात आले आहे. सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (MCOCA) गुन्हा दाखल असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

    बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात भाजप नेते मोहित कंबोज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाबा सिद्दीकी माझे चांगले मित्र होते. मी त्यांच्या मृत्यू पूर्वी तीन ते चार वेळा त्यांची भेट घेतली होती. आणि त्या दिवशीही काही कामा निमित्तानं मी दुपारी त्यांची भेट घेतली होती, असं कंबोज म्हणाले. तसंच, झिशान यांनी केलेलं विधान माध्यमे वेगळ्या पद्धतीनं दाखवत आहेत, असंही ते म्हणाले.