मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांमधील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न उपस्थित करणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र, ही भेट केवळ प्रकृतीची विचारपूस करण्यापुरतीच मर्यादित होती की यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांशी संबंधित राजकीय विषयांवरही चर्चा झाली, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे, या भेटीदरम्यान शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्यात झालेल्या संवादाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे या भेटीला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करणार!

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शरद पवार हे प्रफुल पटेल यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी 10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करू, असे प्रफुल पटेल यांना सांगितल्याचे दिसते. शरद पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

10 तारखेनंतर नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार? या चर्चेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या भवितव्याचा मुद्दा असेल का? की अन्य काही राजकीय विषयांवर विचारविनिमय होणार आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, या संभाव्य चर्चेचा विषय किंवा त्यामागील राजकीय भूमिका याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट पुन्हा एकत्र येणार?

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांचे गट स्वतंत्रपणे राजकारण करत आहेत. दोन्ही गटांमधील नेत्यांचे राजकीय संबंध, संभाव्य युती आणि पक्षाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट आणि 10 तारखेनंतर चर्चेचे दिलेले संकेत यामुळे पुन्हा एकदा दोन्ही गटांच्या संभाव्य जवळिकीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.