जेएनएन, मुंबई: वरळी 'हिट अँड रन' प्रकरणातील (Worli hit and run case) आरोपी मिहीर शाहचे वडील आणि शिवसेनेचे माजी उपनेते राजेश शहा यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर आता पुन्हा त्यांना थेट व्यासपीठावर स्थान देण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

स्वप्नील बांदेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या कार्यक्रमात राजेश शहा व्यासपीठावर दिसले. हेच नव्हे तर वसई-विरार महापालिकेचे माजी नगरसेवक आणि 10 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील आरोपी असलेले स्वप्नील बांदेकर यांनाही एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत प्रवेश दिला. 

विरोधी पक्षांकडून जोरदार टीका 

या दोघांनाही पक्षात पुन्हा सक्रिय केल्यामुळे आणि व्यासपीठावर स्थान दिल्यामुळे शिंदे गटाच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर आणि विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे.

राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शाह याच्यावर वरळी येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात गुन्हा दाखल असून, त्याने एका महिलेला चिरडून ठार केले होते. या घटनेनंतर राजेश शहा यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. 

    याप्रकरणी शिवसेनेच्या शिंदे गट नेतृत्वावर नैतिकतेच्या चौकटीत प्रश्न उपस्थित होत असून, राजकीय फायद्यासाठी गुन्हेगारी प्रकरणातील व्यक्तींना पुन्हा पक्षात सामावून घेणं हे जनतेच्या भावनांशी खेळ असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.