मुंबई. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमान अपघातावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या विमान प्रवासासंदर्भातील काही महत्त्वाची कागदपत्रे समोर आली आहे.अजित पवार यांच्या निधनाच्या तब्बल 14 महिने आधीच्या या कागदपत्रांमधून ते स्वतः व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (VSR Ventures Private Limited) या कंपनीच्या विमानांना पसंती देत असल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनीवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर या कागदपत्रांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले.ज्या विमानातून प्रवास करत होते, ते बॉम्बार्डियर लिअरजेट 45 प्रकारचे विमान व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे होते. या विमानाचा नोंदणी क्रमांक VT-SSK असा होता. या अपघातानंतर विमानाची तांत्रिक स्थिती, उड्डाणादरम्यान घडलेल्या घटना, विमान कंपनीची जबाबदारी आणि अपघातामागील संभाव्य कारणांवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
रोहित पवारांकडून व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघाताच्या तपासाबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हीएसआर कंपनी आणि तिचे मालक व्ही. के. सिंह यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
16 नोव्हेंबर 2026 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अजित पवार यांच्या मृत्यूच्या घातपातामध्ये मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध असल्याचा आरोप आपण करत नसल्याचे स्पष्ट करतानाच, व्हीएसआर कंपनी आणि तिचे मालक व्ही. के. सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणात सरकारची भूमिका, तपासाची दिशा आणि संबंधित कंपनीला मिळणारे संरक्षण याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
अजित पवार स्वतः व्हीएसआरच्या विमानांना पसंती देत होते?
दरम्यान,अजित पवार यांच्या विमान प्रवासासंदर्भातील मृत्यूच्या 14 महिने आधीचा डेटा उपलब्ध झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या कागदपत्रांनुसार अजित पवार हे स्वतः व्हीएसआर कंपनीच्या विमानांना पसंती देत होते, अशी माहिती समोर आली आहे.
