जेएनएन, मुंबई. Mumbai News: महायुती सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका मुंबईतील एका विवाहित महिलेनं गंभीर आरोप केले आहे. सिद्धांत शिरसाट यांनी आपली फसवणूक केली असल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. तसंच, या महिलेनं सिद्धांत शिरसाट यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ, धमकी, फसवणूक, हुंडाच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणात महिलेने सिद्धांत शिरसाट यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

असे आहे प्रकरण

या महिलेने केलेल्या आरोपांनुसार, 2018 मध्ये या विवाहित महिलेची सिद्धांत शिरसाट यांच्याशी ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. दरम्यानच्या काळात दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. चेंबूर येथील एका फ्लॅटवर त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि यावेळी त्यांच्यात शारीरिक संबंध झाल्याचा दावा महिलेने तक्रारीत केला आहे. 

लग्न केल्याचा दावा

महिलेला सिद्धांत शिरसाट नेहमी आत्महत्या करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत होते. महिलेवर लग्नासाठी दबाव टाकत होते. सिद्धांत शिरसाट यांच्यावर विश्वास ठेवून 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने लग्नही केल्याचा दावा संबंधित महिलेने तक्रारीत केला आहे. लग्न केल्याचे पुरावे महिलेकडे असल्याचा दावा केला आहे.

गर्भपात केल्याचा आरोप

    सिद्धांत एवढ्यावरच न थांबता, या संबंधातून महिलेला गर्भधारणा झाली, मात्र सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. संबधित प्रकरणामध्ये महिलेने 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलिस स्टेशनमध्ये संबंधित तक्रार दाखल केली होती. पण सिद्धांत शिरसाट यांचे वडील संजय शिरसाट हे राजकीय नेते असल्यामुळे पोलीसांनी याबाबत कारवाई न करता प्रकरण दाबल्याचा आरोपही महिलेनं आपल्या तक्रारीत केला आहे.

    न्याय द्यावा अशी मागणी

    ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांनी पाठविलेल्या नोटिसमध्ये सात दिवसांच्या आत सिद्धांत शिरसाट यांनी महिलेला घरी घेऊन जावे आणि न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. न्याय न दिल्यास महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.