जेएनएन, मुंबई: राज्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नद्या- नाल्याने धोक्याची  पातळी ओलांडली आहे. गावोगावी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे  शेतातील खरीप पिकांला मोठा फटका बसला आहे, तर काही ठिकाणी शेतीच जलमय झाली आहे.

लाखो हेक्टर पिके पाण्याखाली!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राज्यात 12 ते 14 लाख हेक्टर शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले आहे. यामध्ये खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन, कापूस ज्वारी, तूर आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सोबतच भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

5.5 लाख हेक्टरांवर पिकांचे थेट नुकसान!

  • हवामान विभाग व कृषी विभागाच्या अहवालानुसार, आतापर्यंत 5.5 लाख हेक्टरांवरील पिकांचे थेट नुकसान झाले आहे.
  • नांदेड जिल्हा सर्वाधिक प्रभावित – 2.59 लाख हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे.
  • हिंगोली जिल्ह्यात – 56,806 हेक्टर पीक पाण्याखाली गेले आहे.
  • पारभणी – 21,092 हेक्टरमध्ये पाणी साचले आहे.
  • धराशिव – 15,326 हेक्टर क्षेत्रात पाण्याचे तळे भरले आहे.
  • जळगाव – 12,326 हेक्टर
    तसेच बीड, लातूर, संभाजीनगर जिल्ह्यांमध्येही हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आहे.

मराठवाड्यात गंभीर स्थिती!
मराठवाडा विभागात पावसाने कहर केला आहे. गेल्या पाच दिवसांत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.तर 3.58 लाख हेक्टर शेतीक्षेत्र बाधित झाले आहे.

या भागातील 4.38 लाख शेतकरी थेट प्रभावित झाले असून, शेकडो जनावरांचा बळी गेला आहे. अनेक गावांमध्ये घरे व रस्ते जलमय झाले आहेत.

सरकारची तत्काळ कारवाई!

    • मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल राज्यातील परिस्थितीचा उच्चस्तरीय आढावा घेतला.
    • जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले.
    • NDRF व SDRF योजनेतून मदत तात्काळ वितरित करण्याचे निर्देश दिले.
    • पूरपरिस्थिती असलेल्या भागांमध्ये मदत शिबिरे उभारण्याचे आदेश दिले आहेत.

    शेतकऱ्यांचे मोठे आव्हान!
    पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सोयाबीन आणि कापूस ही राज्यातील मुख्य खरीप पिके असल्याने त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होणार आहे. अनेकांना बियाणे व खते पुन्हा घेऊन पेरणी करावी लागणार आहे.त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

    हेही वाचा:Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर ओसरला मात्र सरींवर सरी सुरुच; हार्बर रेल्वे सेवा 15 तासांनंतर पुन्हा रुळावर