जेएनएन, मुंबई. Mumbai Electricity Tariff Cut: राज्यातील महावितरणने वीज दर वाढवण्याची घोषणा करताच जनतेमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र फडणवीस सरकारने पावसाळी अधिवेशनात मोठा निर्णय घेत राज्यातील नागरिकांना दिलासा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारने वीज दर कपातीचा मोठा निर्णय घेतला असून, महायुती सरकारने जाहीर केलेल्या या योजनेत 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना याचा थेट फायदा होणार आहे. त्यामुळे कमी वीज वापरणाऱ्यांच्या खिशाला दिलासा मिळणार आहे.
सरकारच्या निर्णयामुळे पुढील 5 वर्षं वीज दरात वाढ होणार नाही, अशी घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईने हैराण झालेल्या सामान्य नागरिकांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की राज्यातील तब्बल 70 टक्के ग्राहकांचा वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे. त्यामुळे या 70 टक्के ग्राहकांना थेट 26 टक्के दर कपातीचा फायदा होणार आहे.
वीज सबसिडीसाठी लवकरात लवकर अनुदान द्या -
ऊर्जा विभागाने वीज निर्मिती व खर्च याबाबत योग्य नियोजन केले तर ग्राहकांना माफक दरात वीज वितरण करणे शक्य होणार आहे. सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरीत करावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त विभागाला दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ऊर्जा विभागातंर्गत योजना राबविण्यासाठी वित्त विभागाकडे मागणी केलेल्या सविस्तर प्रस्तावातील सर्व बाबी तपासून घेवून तातडीने आवश्यक निधी वित्त विभागाने वेळेत वितरीत करावा. राज्यातील वीज वितरण व्यवस्थेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक तिथे नियमांनुसार बदल करावे. थकबाकी वेळेत वसुल होण्यासाठी कार्यवाही करावी. महावितरणला मंजूर झालेला आर्थिक वर्षाचा निधी आणि तूट याची तफावत वाढू नये याची खबरदारी घेण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.