जेएनएन, डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील गोपी चौक परिसरात 14 वर्षीय मुलाचा नाल्यात पडून मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नाल्यावर झाकण नसल्याने मुलगा संतुलन गमावून नाल्यात कोसळला. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे तो वाहून गेला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला.
KDMC प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप
घटनास्थळी काही वेळ खळबळ माजली. स्थानिकांनी संताप व्यक्त करत KDMC प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. अनेक ठिकाणी उघडी नाले असून, तिथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. एवढ्या मोठ्या शहरात मुलाच्या जीवावर बेतल्यानंतरच पालिका जागी होते का?" असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला
घटनेनंतर KDMC चे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित नाल्यावर तातडीने झाकण बसवण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र नागरिकांचा रोष ओसरण्याचे नाव घेत नाही. मुलाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ पसरली आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
दरम्यान, या प्रकरणी चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील सर्व उघड्या नाल्यांवर तातडीने झाकणं बसवावीत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.