जेएनएन, मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session 2025) सुरु आहे. या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या आत्महत्येपासून विविध मुद्दांवर चर्चा सुरु आहे. आमदार आपआपल्याला भागातील समस्या मांडत आहेत. यातच आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी एक महत्त्वाचा मुद्दा विधानसभेत मांडला. धाराशिव आणि पनवेल येथील पोषण आहारात आळ्या निघाल्याची आणि निकृष्ट पोषण आहार मुलांना आणि महिलांनी दिला जात असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. यावर विधान सभा अध्यक्षांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

मुलांच्या जीवाशी खेळ

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत मिलेट बार देण्यात येतात धाराशिव तालुक्यातील पाच शाळांमध्ये या बारमध्ये अळ्या सापडल्या. दोन दिवस हा प्रकार घडला हे गंभीर आहे. मुलांच्या जीवाशी हे खेळणे आहे. FDA ने तपासणी न करता याचा पुरवठा झाला कसा असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

 पोषण आहार निकृष्ट

पनवेल इथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्या मध्ये गर्भवती माता आणि लहान बालकांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट आहे. आहाराचे पाकीट उघडताच त्यात घाण वास येते त्यात मुंग्या असतात. असा पोषण आहार घरी न आणलेला बरा असे लाभार्थीना वाटते. त्यामुळे पोषण आहारात असा भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांना कारवाई करण्यात यावी. त्यांना काळया यादीत टाकावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 

यावर विधानसभा अध्यक्ष यांनी शासनाने नोंद घेऊन कारवाई करू असे निर्देश दिले.