जेएनएन, मुंबई. Maharashtra Monsoon Session 2025 Latest News: राज्य शासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. मुंबईत प्रवाशांची होणारी गर्दी पाहता प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी राज्य शासनाने जलवाहतूक, पॉड टॅक्सी (हवेतून चालणाऱ्या टॅक्सी) आणि रोप वे यासारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा विचार सुरू केला आहे. अशा परिवहन सेवांच्या माध्यमातून परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाय योजना करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली.
रेल्वे केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असली, तरी राज्यातील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत राज्य शासन गंभीर आहे. मुंब्रा येथील रेल्वे अपघात ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू तर 9 प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने सरकारी व खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे अशी माहिती नाईक यांनी दिली.
हेही वाचा - Maharashtra Politics: आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ! शिवसेनेने रिपब्लिकन सेनेशी केली युती
मुंब्रा येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपायोजना करणे संदर्भात रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. मुंबईतील रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी करणे, रेल्वे स्थानकामधील गर्दीचे व्यवस्थापन करणे, रेल्वे प्रवासादरम्यान होणारे प्रवाशांचे मृत्यू टाळणे व रेल्वे स्थानकांची सुरक्षा यासंदर्भात उपाय योजना करण्याचे निर्देश रेल्वे विभागास देण्यात आले आहेत अशी माहिती नाईक यांनी दिली आहे.
मुंबईसह राज्यातील वाढत्या रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी शासन विविध उपाय योजना राबवित असून या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल.
परिवहन सेवेवरील वाढता ताण कमी करण्यासाठी खाजगी आस्थापनांच्या कार्यालयीन वेळेबाबत टास्क फोर्स स्थापन करावा लागेल. या संदर्भातही उचित कार्यवाही केली जाईल. तसेच अॅप-आधारित परिवहन सेवांच्या गैरप्रकारांवरही सरकारने कारवाई सुरू केली आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली आहे.