मुंबई. Maharashtra MLC Election: महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी महायुतीतील जागावाटप आणि उमेदवारीचा मुद्दा चांगलाच तापला आहे.पुणे पदवीधर आणि नागपूर पदवीधर मतदारसंघांवरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पुण्याची जागा नेमका कोणता पक्ष लढवणार, याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे नागपूरमध्ये भाजपच्या उमेदवारीसाठी पक्षातीलच अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असल्याने सस्पेन्स कायम आहे.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर पदवीधर, तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघात निवडणूक होणार आहे. 29 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 6 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. 7 ऑक्टोबरला अर्जांची छाननी, 9 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत, 23 ऑक्टोबरला मतदान आणि 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

पुणे पदवीधरवरून महायुतीत पेच

पुणे पदवीधर मतदारसंघ महायुतीतील जागावाटपासाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या जागेवर भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडूनही दावा केला जात असल्याने अंतिम निर्णय घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुणे पदवीधरची जागा कोण लढवणार याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणे घेतील, असे सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यातील चर्चेनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.