जेएनएन, मुंबई. महाराष्ट्रातील एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन रुग्णवाहिका सेवांचे संचालन अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रभावी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या सेवांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (Standard Operating Procedure – SOP) तयार करण्यासाठी परिवहन विभागाने सात सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीला शासन निर्णयाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत आपला सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
राज्यात रस्ते अपघातांची संख्या आणि अपघातांनंतर जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आपत्कालीन आरोग्य सेवांची यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर सरकारने भर दिला आहे. विशेषतः महामार्गांवर होणाऱ्या गंभीर अपघातांमध्ये जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवणे अनेकदा आव्हानात्मक ठरते. वाहतूक कोंडी, रुग्णालयांपासून अपघातस्थळाचे अंतर आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे उपचार मिळण्यास विलंब होऊ शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन एअर ॲम्ब्युलन्स सेवेसह नवीन रुग्णवाहिका सेवांसाठी एकसमान कार्यपद्धती निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सात सदस्यीय समिती काय करणार?
एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन रुग्णवाहिका सेवांच्या नियोजनापासून प्रत्यक्ष संचालनापर्यंत आवश्यक असलेल्या विविध बाबींचा समिती अभ्यास करणार आहे. यामध्ये रुग्णवाहिकांची उपलब्धता, आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्याची यंत्रणा, रुग्णांना सुरक्षितपणे रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया आणि संबंधित विभागांमधील समन्वय यांचा समावेश असणार आहे.
तसेच या सेवांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक निकष, मनुष्यबळ, वैद्यकीय सुविधा, सेवा पुरवठादारांची जबाबदारी आणि नियंत्रण यंत्रणा याबाबतही प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे. समितीने दोन महिन्यांच्या आत अहवाल सादर केल्यानंतर शासनाकडून पुढील निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
महामार्गांवर एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचे नियोजन
दरम्यान, राज्यातील महत्त्वाच्या महामार्गांवर एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचे नियोजन परिवहन विभागाने केले आहे. समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर या सेवेला प्राधान्य देण्यात येणार आहे. गंभीर अपघातांतील जखमींना कमीत कमी वेळेत ट्रॉमा केअर सेंटर किंवा योग्य वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
अपघातानंतरचा पहिला तास म्हणजेच ‘गोल्डन अवर’ जखमींच्या उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या कालावधीत योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचविण्याची शक्यता वाढू शकते. मात्र, महामार्गांवरील वाहतूक कोंडी किंवा रुग्णालयांचे अंतर यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडथळे निर्माण होतात. अशा परिस्थितीत हवाई रुग्णवाहिका सेवा उपयुक्त ठरू शकते.
आरोग्य, परिवहन आणि पोलीस विभागांमध्ये समन्वय
या संपूर्ण यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणांनी कोणत्या पद्धतीने कार्यवाही करावी, जखमींना कोणत्या रुग्णालयात हलवावे आणि एअर ॲम्ब्युलन्सची मदत कधी घ्यावी, यासाठी स्पष्ट नियमावली तयार केली जाणार आहे.
याशिवाय ट्रॉमा केअर सेंटरचे जाळे निश्चित करणे, सेवा पुरवठादारांचे पॅनेल तयार करणे आणि आवश्यक आर्थिक तरतूद करण्यासाठी रस्ता सुरक्षा निधीचा वापर करण्याचाही विचार आहे.
